नाट्य शाखा


“तुझे आहे तुजपाशी”
अतुल परचुरे व दाजी भाटवडेकर

गोरा कुंभार

गोरा कुंभार
नाट्य शाखा

साहित्य संघाच्या दि. २४ ऑक्टोबर १९४३ या दिवशी भरलेल्या साधारण सभेने पुढील ठराव संमत केला. ‘मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा व यासंबंधीची सर्व व्यवस्था कार्यकारी मंडळाने करावी’. या ठरावानुसार साहित्य संघाने मुंबईतील इतर संस्थांच्या सहकार्याने हा शतसांवत्सरिक महोत्सव दि. १५ एप्रिल १९४४ पासून मोठ्या भव्य प्रमाणावर साजरा केला.

१९४३ च्या नोव्हेंबर मध्ये सांगली येथे मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला. त्यात साहित्य संघाने कै. देवल यांच्या शारदा नाटकाच्या निर्मितीची जवाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पार पाडली. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कै. चिंतूबुवा गुरव यांनी दीर्घ कालावधीनंतर केलेली त्या नाटकातील श्रीमंताची भूमिका. तसेच, श्री. बालगंधर्व, श्री. गणपतराव बोडस, श्री. केशवराव दाते, कै. चिंतामणराव कोल्हटकर यांचे रंगभूमीवर एकत्र दर्शन.

१९४९ साली नाट्यविषयक कार्य सातत्याने करण्यासाठी संघाने नाट्यशाखेची स्थापना केली.

१९५१ साली नाटकांवरील करमणूक कर माफ व्हावा, नाट्यगृहे व नाट्यप्रयोग याबाबत इतर सरकारी निर्बंध दूर व्हावेत म्हणून संघाने त्यावेळचे मुंबई राज्याचे गृहमंत्री श्री. मोरारजी देसाई यांची भेट घेऊन आपले निवेदन त्यांस सादर केले व तासभर या विषयावर त्यांच्याशी सांगोपांग चर्चा केली.

१९५४ सालचा नाट्यशाखेचा महत्वाचा विक्रम म्हणजे या शाखेने दिल्ली येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘भाऊबंदकी’ हे नाटक सादर केले व पारंपारिक विभागात या नाटकाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला.

नाट्य शाखेचे सध्याचे विविध उपक्रम

  • मे ५ ते मे ९ – कै. दामू केंकरे स्मृती नाट्योत्सव – हा ५ दिवसाचा रंगोत्सव प्रायोगिक नाटकांचा महोत्सव.
  • २५ ऑगस्ट – साहित्य संघाचे आध्य संस्थापक कै.डॉ. अ.ना.भालेराव यांचा स्मृतीदिन. या दिवशी मराठी रंगभूमीवरील अनेक जेष्ठ कलावंत, गायक, वादक, लेखक, दिग्दर्शक, रंगमंच कामगार, रंगभूषाकार यांना “साहित्य संघ नाट्य सेवा गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते.
  • २८ ऑक्टोबर – ‘साहित्य संघ दिन’- साहित्य संघाची स्थापना जरी २१ जुलै १९३५ या दिवशी झाली तरी प्रत्यक्ष संघकार्याची सुरुवात २८ ऑक्टोबर १९३५ ला झाली म्हणून या दिवशी साहित्य विषयक व नाटकाचे विविध कार्यक्रम होतात.
  • १२ डिसेंबर – साहित्य संघाचे आध्य संस्थापक कै. डॉ. अ. ना. भालेराव यांचा हा जन्म दिवस. त्यांच्याच नावाने “अमृत कुंभ” एकांकिका स्पर्धा घेतली जाते.
  • २६ डिसेंबर –”कै. दाजी भाटवडेकर स्मृती दिन” या दिवशी नाट्य प्रवेश, नाट्य संगीत असे कार्यक्रम सदर केले जातात. हा कार्यक्रम “दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन” व साहित्य संघ या दोन संस्था मिळून करतात.