एक कळकळीचे आवाहन
एक कळकळीचे आवाहन
मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था गेली 84 वर्षे अविरतपणे मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमी यांची सेवा करीत आहे. मराठी सांस्कृतिक जीवनाला प्रोत्साहन देत, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत ती मुंबईतील अग्रगण्य मराठी संस्था बनून राहिली आहे.महाराष्ट्राच्या बदलत्या सामाजिक वातावरणाची दखल घेत राहूनही या संस्थेने आपली ध्येयधोरणे जपून ठेवलेली आहेत.
संस्थेची साहित्यशाखा प्रतिवर्षी जुन्या-नव्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव करते; महानगर तसेच महाविद्यालयीन साहित्य संमेलने आयोजित करते; “साहित्य” हे दर्जेदार त्रैमासिक प्रसिध्द करते; अमराठी भाषकांसाठी मराठी भाषेचे वर्ग चालवते; “अक्षर-साहित्य” उपक्रमाअंतर्गत अनेक छोटे प्रकाशन समारंभ, चर्चा, कविसंमेलने इत्यादी आयोजित करते; संदर्भ-मूल्य असलेली पुस्तके प्रसिध्द करते. इत्यादी.
नाट्यशाखेतर्फे अनेक स्पर्धा योजल्या जातात; नव्या-जुन्या नाटकांची निर्मिती होते;गुणवंत कलाकारांचा पुरस्कारांनी गौरव केला जातो; नाट्य-संगीत स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच अनेक स्पर्धांमध्ये साहित्य संघाची नाटके सादर केली जातात.
संस्थेच्या संदर्भ ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. संस्थेचे एक मोठे सुसज्ज नाट्यगृह असून दोन छोटी सभागृहे आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ही संस्था नोंदणीकृत कार्यालय आहे.
संस्थेला शक्य तेवढी आर्थिक मदत करावी अशी विनंती आहे.