साहित्य शाखेचे सध्याचे विविध उपक्रम
कुमुद विद्यामंदिरात साहित्य संमेलन
‘आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी,’ असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी देवनार येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि देवनार येथील कुमुद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी साहित्याच्या प्रयोजनाबद्दल आणि संमेलनाच्या आयोजनाबद्दल मौलिक विचार मांडले. कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांनी मंगेश पाडगावकरांची कविता सादर करून साहित्य मनोरंजनाबरोबर प्रबोधन करते असे सांगितले. साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी साहित्य संघाच्या कार्याचा आढावा घेतला आणि संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कुमुद मेमोरियल फंडच्या अध्यक्ष श्रीमती मीना पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका रश्मी गायकवाड यांनी स्वागत करताना शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल माहिती दिली. ‘नोकरीच्या मागे न लागता सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरावे’ असे संमेलनाच्या उद्घाटक अलबत्या गलबत्या फेम अभिनेत्री श्रध्दा हांडे यांनी सांगितले.
सकाळी नऊ वाजता श्री. पुंडपाळ, प्रा. प्रतिभा सराफ, समन्वयक एकनाथ आव्हाड, श्रीमती प्रतिभा बिस्वास यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने व ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. यावेळी लेझिम आणि ढोल ताशाच्या गजरात ग्रंथदिडी काढण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमापूजनाने संमेलनाची प्रत्यक्ष सुरवात झाली. ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दुसऱ्या सत्रात ‘श्यामशी आई’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात ‘श्याम’ची भूमिका बालकलाकाराची भूमिका निभावणारा अभिनेता शर्व गाडगीळ याची विद्यार्थ्यांनी घेतलेली मुलाखत, ज्येष्ठ कथाकथनकार मेघना साने व ज्येष्ठ कवी प्रथमेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आंतरशालेय कथाकथन व कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभराच्या संमेलनाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.













